स्वामी चरित्र सारामृत १ ते २१ अध्याय

0 People Like This
❴SHARE THIS PDF❵ FacebookX (Twitter)Whatsapp

स्वामी चरित्र सारामृत १ ते २१ अध्याय

गुरुचरित्र पारायण वाचण्याची संधी मिळाली तर भाविक आवर्जुन या संधीचा लाभ घेतात. या ग्रंथाचे ५२ अध्याय आहेत तर काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत. श्री दत्तात्रेय महा प्रभूंनी नामधारकास अती सामान्यांना गुरुप्रणीत मार्ग मिळावा म्हणून श्री गुरु चरित्र सांगितले आहे. श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो. श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे, असे सांगितले जाते. श्री गुरु चरित्राचे पारायण हे अंतःकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते.

श्रीगुरुचरित्र या ग्रंथाचे ५२ अध्याय असून ओवीसंख्या ७,४९१ इतकी आहे. काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत. त्याची विभागणी ज्ञानकाण्ड, कर्मकाण्ड, भक्तिकाण्ड यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे, याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने आपल्या ओघवत्या भाषेत केले आहे. या ग्रंथात श्रीपादश्रीवल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या लीलांचे चमत्कृतिपूर्ण वर्णन रसाळपणे केले आहे. इतकेच नव्हे तर श्रीगुरुंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लीलांचे कथात्मक निरुपण अतिशय सुबोध व प्रासादिक भाषेत केले आहे.

श्री स्वामी चरित्र सारामृत १ ते २१ अध्याय

श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला –

।। श्री स्वामी चरित्र सारामृत प्रथमोध्याय ।।

॥ श्री गणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नमः ॥ श्री गुरुभ्यो नमः ॥ श्री कुलदेवतायै नमः ॥ श्री अक्कलकोट निवासी-पूर्णदत्तावतार-दिगंबर-यतिवर्य स्वामिराजाय नमः ॥

ब्रम्हानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं ।
द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् ॥
एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतं ।
भावातीतं त्रिगुणरहितं सद़्गुरुं तं नमामि ॥

जयजय श्री जगरक्षका । जयजयाजी भक्तपालका । जयजय कलिमलनाशका । अनादिसिद्धा जगद्गुरु ॥१॥

जयजय क्षीरसागर विलासा । मायाचक्रचालका अविनाशा । शेषशयना अनंतवेषा । अनामातीता अनंता ॥२॥

जयजयाजी गरुडवाहना । जयजयाजी कमललोचना । जयजयाची पतितपावना । रमारमणा विश्वेशा ॥३॥

घवर्ण आकार शांत । मस्तकी किरीट विराजित । तोच स्वयंभू आदित्य । तेज वर्णिले न जाय ॥४॥

विशाळ भाळ आकर्ण नयन । सरळ नासिका सुहास्य वदन । दंतपंक्ति कुंदकळ्यांसमान । शुभ्रवर्ण विराजती ॥५॥

रत्नमाला हृदयावरी । जे कोटी सूर्यांचे ते हरी । हेममय भूषणे साजिरी । कौस्तुभमणि विशेष ॥६॥

वत्सलांच्छनाचे भूषण । चेति प्रेमळ भक्तिची खूण । उदरी त्रिवळी शोभायमान । त्रिवेणीसंगमासारखी ॥७॥

नाभिकमल सुंदर अति । जेथे विधात्याची उत्पत्ती । की चराचरा जन्मदाती । मूळ चननी तेचि पै ॥८॥

जानूपर्यंत कर शोभति । मनगटी कंकणे विराजती । करकमलांची आकृति । रक्तपंकजासमान ॥९॥

भक्ता द्यावया अभय वर । सिद्ध सर्वदा सव्य कर । गदा पद्म शंख चक्र । चार हस्ती आयुधे ॥१०॥

कांसे कसिला पीतांबर । विद्युल्लतेसम तेज अपार । कर्दळीस्तंभापरी सुंदर । उभय जंघा दिसताती ॥११॥

जेथे भक्तजन सुखावती । ज्याच्या दर्शने पतीत तरती । ज्याते अहोरात्र ध्याती । नारदादि ऋषिवर्य ॥१२॥

ज्याते कमला करे चुरीत । संध्यारागा समान रक्त । तळवे योग्य चिन्हे मंडित । वर्णित वेद शीणले ॥१३॥

चौदा विद्या चौसष्ट कला । ज्याते वर्णित थकल्या सकळा । ऐशा त्या परम मंगला । अल्पमती केवि वर्णू ॥१४॥

नारदादि मुनीश्वर । व्यास वाल्मिकादि कविवर । लिहू न शकले महिमांवर । तेथे पामर मी काय ॥१५॥

जो सकळ विश्वाचा जनिता । समुद्रकन्या ज्याची कांता । जो सर्व कारण कर्ता । ग्रंथारंभी नमू तया ॥१६॥

त्या महाविष्णूचा अवतार । गजवदन शिवकुमार । एकदंत फरशधर । अगम्य लीला जयांची ॥१७॥

जो सकळ विद्यांचा सागर । चौसष्ट कलांचे माहेर । रिद्धि सिद्धीचा दातार । भक्त पालक दयाळू ॥१८॥

मंगल कार्या करिता स्मरण । विघ्नें जाती निरसोन । भजका होई दिव्य ज्ञान । वेदांतसार कळे पां ॥१९॥

सकल कार्यारंभी जाणा । करिती ज्याच्या नामस्मरण । ज्याच्या वरप्रसादे नाना । ग्रंथरचना करिती कवी ॥२०॥

तया मंगलासी साष्टांग नमन । करूनी मागे वरदान । स्वामी चरित्र सारामृत पूर्ण । निर्विघ्नपणे होवो हे ॥२१॥

जिचा वरप्रसाद मिळता । मूढ पंडित होती तत्त्वता । सकळ काव्यार्थ येत हाता । ती ब्रह्मसुता नमियेली ॥२२॥

मूढमती ती अज्ञान । काव्यादिकांचे नसे ज्ञान । माते तू प्रसन्न होवोन । ग्रंथरचना करवावी ॥२३॥

जो अज्ञानतिमिरनाशक । अविद्याकाननच्छेदक । जो सद़्बुद्धीचा प्रकाशक । विद्यादायक गुरुवर्य ॥२४॥

ज्याचिया कृपेकरोन । सच्छिष्या लाधे दिव्यज्ञान । तेणेच जगी मानवपण । येतसे की निश्चये ॥२५॥

तेवी असता मातापितर । तैसेचि श्रेष्ठ गुरुवर्य । चरणी त्यांचिया नमस्कार । वारंवार साष्टांग ॥२६॥

मी मतिमंद अज्ञ बाळ । घेतली असे थोर आळ । ती पुरविणार दयाळ । सद़्गुरुराज आपणची ॥२७॥

नवमास उदरी पाळिले । प्रसववेदनांते सोशिले । कौतुके करूनी वाढविले । रक्षियेले आजवरी ॥२८॥

जननीजनका समान । अन्य दैवत आहे कोण । वारंवार साष्टांग नमन । चरणी तयांच्या करीतसे ॥२९॥

ब्रम्हा विष्णू महेश्वर । तिन्ही देवांचा अवतार । लीलाविग्रही अत्रिकुमार । दत्तात्रेय नमियेला ॥३०॥

तीन मुखे सहा हात । गळा पुष्पमाळा शोभत । कर्णी कुंडले तेज अमित । विद्युल्लतेसमान ॥३१॥

कामधेनू असोनि जवळी । हाती धरिली असे झोळी । जो पहाता एका स्थळी । कोणासही दिसेना ॥३२॥

चार वेद होउनी श्वान । वसती समीप रात्रंदिन । ज्याचे त्रिभुवनी गमन । मनोवेगे जात जो ॥३३॥

त्या परब्रम्हासी नमन । करोनि मागे वरदान । स्वामी चरित्र सारामृत पूर्ण । होवो कृपेने आपुल्या ॥३४॥

वाढला कलीचा प्रताप । करू लागले लोक पाप । पावली भूमि संताप । धर्मभ्रष्ट लोक बहू ॥३५॥

पहा कैसे दैव विचित्र । आर्यावर्ती आर्यपुत्र । वैभवहीन झाले अपार । दारिद्र्य, दुःखे भोगिती ॥३६॥

शिथिल झाली धर्मबंधने । नास्तिक न मानिती वेदवचने । दिवसेंदिवस होमहवने । कमी होऊ लागली ॥३७॥

सुटला धर्माचा राजाश्रय । अधर्मप्रवर्तका नाही भय । उत्तरोत्तर नास्तिकमय । भरतखंड जाहले ॥३८॥

नाना विद्या कला । अस्तालागी गेल्या सकला । ऐहिक भोगेच्छा बळावल्या । तेणे सुटला परमार्थ ॥३९॥

र्मसंस्थापनाकारणे । युगायुगी अवतार घेणे । नानाविध वेष नटणे । जगत्पतीचे कर्तव्य ॥४०॥

लोक बहु भ्रष्ट झाले । स्वधर्माते विसरले । नास्तिकमतवादी मातले । आर्यधर्माविरुद्ध ॥४१॥

मग घेतसे अवतार । प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार । अक्कलकोटी साचार । प्रसिद्ध झाला स्वामीरुपे ॥४२॥

कोठे आणि कोणत्या काळी । कोण्या जातीत कोणत्या कुळी । कोण वर्णाश्रम धर्म मुळी । कोणासही कळेना ॥४३॥

ते स्वामी नामे महासिद्ध । अक्कलकोटी झाले प्रसिद्ध । चमत्कार दाविले नानाविध । भक्त मनोरथ पुरविले ॥४४॥

त्यांसी साष्टांग नमोनी । करी प्रार्थना कर जोडोनी । आपुला विख्यात महिमा जनी । गावयाचे योजिले ॥४५॥

तुमचे चरित्र महासागर । पावेन कैसा पैलतीर । परि आत्मसार्थक करावया साचार । मीन तेथे जाहलो ॥४६॥

किंवा अफाट गगनासमान । अगाध आपुले महिमान । अल्पमती मी अज्ञान । आक्रमण केवी करू ॥४७॥

पिपीलिक म्हणे गिरीसी । उचलून घालीन काखेसी । किंवा खद्योत सूर्यासी । लोपवीन म्हणे स्वतेजे ॥४८॥

तैसी असे माझी आळ । बाळ जाणूनी लडिवाळ । पुरविता तु दयाळ । दीनबंधू यतिवर्या ॥४९॥

कर्ता आणि करविता । तूचि एक स्वामीनाथा । माझिया ठाई वार्ता । मीपणाची नसेची ॥५०॥

ऐसी ऐकुनिया स्तुती । संतोषली स्वामीराजमूर्ति । कविलागी अभय देती । वरदहस्ते करोनी ॥५१॥

उणे न पडे ग्रंथांत । सफल होतील मनोरथ । पाहूनी आर्यजन समस्त । संतोषतील निश्चये ॥५२॥

ऐसी ऐकोनि अभयवाणी । संतोष झाला माझिया मनी । यशस्वी होवोनी लेखणी । ग्रंथसमाप्तीप्रति होवो ॥५३॥

आतां नमू साधुवृंद । ज्यासी नाही भेदाभेद । ते स्वात्मसुखी आनंदमय । सदोदित राहती ॥५४॥

मग नमिले कविश्वर । जे शब्दसृष्टीचे ईश्वर । ज्यांची काव्ये सर्वत्र । प्रसिद्ध असती या लोकी ॥५५॥

व्यास वाल्मिक महाज्ञानी । बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी । वारंवार तयांच्या चरणी । नमन माझे साष्टांग ॥५६॥

विकुलमुकुटावतंस । नमिले कवि कालिदास । ज्यांची नाट्यरचना विशेष । प्रिय जगी जाहली ॥५७॥

श्रीधर आणि वामन । ज्यांची ग्रंथरचना पाहोन । ज्ञातेही डोलविती मान । तयांचे चरण नमियेले ॥५८॥

ईशचरणी जडले चित्त । ऐसे तुकारामादिक भक्त । ग्रंथारंभी तया नमित । वरप्रसादाकारणे ॥५९॥

अहो तुम्ही संत जनी । मज दीनावरी कृपा करोनी । आपण हृदयस्थ राहोनी । ग्रंथरचना करवावी ॥६०॥

आता करू नमन । जे का श्रोते विलक्षण । महाज्ञानी आणि विद्वान । श्रवणी सादर बैसले ॥६१॥

महापंडित आणि चतुर । ऐसा श्रोतृसमाज थोर । मतिमंद मी त्यांच्यासमोर । आपले कवित्व केवी आणू ॥६२॥

परी थोरांचे लक्षण । एक मला ठाउके पूर्ण । काही असता सद्गुण । आदर करिती तयाचा ॥६३॥

संस्कृताचा नसे गंध । मराठीही न ये शुद्ध । नाही पढलो शास्त्रछंद । कवित्वशक्ती अंगी नसे ॥६४॥

परी हे अमृत जाणोनी । आदर धरावा जी श्रवणी । असे माझी असंस्कृत वाणी । तियेकडे न पहावे ॥६५॥

न पाहता जी अवगुण । ग्राह्य तितुकेच घ्यावे पूर्ण । एवढी विनंती कर जोडोनी । चरणी आपुल्या करीतसे ॥६६॥

स्वामींच्या लीला बहुत । असती प्रसिद्ध लोकांत । त्या सर्व वर्णिता ग्रंथ । पसरेल समुद्रसा ॥६७॥

त्या महोदधीतुनी पाही । अमोल मुक्ताफळे घेतली काही । द्यावया मान सूज्ञाही । अवमान काही न करावा ॥६८॥

की हे उद्यान विस्तीर्ण । तयामाजी प्रवेश करोन । सुंदर कुसुमे निवडोन । हार त्यांचा गुंफिला ॥६९॥

कवि होवोनिया माळी । घाली श्रोत्यांच्या गळी । उभा ठाकोनि बद्धांजुळी । करी प्रार्थना सप्रेमे ॥७०॥

अहो या पुष्पांचा सुवास । तृप्त करील आपुले मानस । हा सुगंध नावडे जयास । तेचि पूर्ण अभागी ॥७१॥

आता असोत हे बोल । पुढे कथा बहु अमोल । वदविता स्वामी दयाळ । निमित्त मात्र विष्णुकवि ॥७२॥

वैराग्य प्रत्यक्ष शंकर । तेजे कैसा सहस्त्रकर । दुष्टां केवळ सूर्यपुत्र । भक्तां मातेसमान ॥७३॥

यतिराजपदकल्हार । विष्णुकवि होऊनी भ्रमर । ज्ञानमधुस्तव साचार । रुंची तेथे घालीतसे ॥७४॥

इति श्रीस्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । आदरे भक्त परिसोत । प्रथमोऽध्याय गोड हा ॥७५॥

श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥

श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दुसरा pdf

।। श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीयोध्याय ।।

॥ श्री गणेशाय नमः ॥

कामना धरोनी जे भजती । होय त्यांची मनोरथपूर्ति । तैसेचि निष्काम भक्ताप्रती । कैवल्यप्राप्ती होतसे ॥१॥

नृसिंहसरस्वती प्रगट झाले । अगणित पापी तारिले । कर्दळीवनी गुप्त जहाले । गुरुचरित्री ती कथा ॥२॥

पुढे लोकोद्धाराकारणे । भाग पडले प्रगट होणे । धुंडिली बहुत पट्टणे । तेचि स्वामी यतिवर्य ॥३॥

स्वामींची जन्मपत्रिका । एका भक्ते केली देखा । परी तिजविषयी शंका । मनामाजी येतसे ॥४॥

गुरुराज गुप्त झाले । स्वामीरूपे प्रगटले । त्यांचे शकप्रमाण न मिळे । म्हणोनि शंका पत्रिकेची ॥५॥

ते केवळ अनादिसिद्ध । खुंटला तेथे पत्रिकावाद । लोकोद्धारासाठी प्रसिद्ध । मानवरूपे जाहले ॥६॥

अक्कलकोटा-माझारी । राचप्पा मोदी याचे घरी । बैसली समर्थांची स्वारी । भक्तमंडळी वेष्टित ॥७॥

साहेब कोणी कलकत्त्याचा । हेतू धरोनी दर्शनाचा । पातला त्याच दिवशी साचा । आदर तयाचा केला की ॥८॥

त्याजसवे एक पारसी । आला होता दर्शनासी । ते येण्यापूर्वी मंडळीसी । महाराजांनी सुचविले ॥९॥

तीन खुर्च्या आणोनी बाहेरी । मांडा म्हणती एके हारी । दोघांसी बैसवोनी दोहोवरी । तिसरीवरी बैसले आपण ॥१०॥

पाहोनी समर्थांचे तेज । उभयतांसी वाटले चोज । साहेबाने प्रश्न केला सहज । आपण आला कोठूनी ॥११॥

स्वामींनी हास्यमुख करोनी । उत्तर दिले तयालागोनी । आम्ही कर्दळीवनांतुनी । प्रथमारंभी निघालो ॥१२॥

मग पाहिले कलकत्ता शहर । दुसरी नगरे देखिली अपूर्व । बंगालदेश समग्र । आम्ही असे पाहिला ॥१३॥

घेतले कालीचे दर्शन । पाहिले गंगातटाक पावन । नाना तीर्थे हिंडोन । हरिद्वाराप्रती गेलो ॥१४॥

पुढे पाहिले केदारेश्वर । हिंडलो तीर्थे समग्र । ऐसी हजारो हजार । नगरे आम्ही देखिली ॥१५॥

मग तेथुनी सहज गती । पातलो गोदातटाकाप्रती । जियेची महाप्रख्याती । पुराणांतरी वर्णिली ॥१६॥

केले गोदावरीचे स्नान । स्थळे पाहिली परम पावन । काही दिवस फिरोन । हैदराबादेसी पातलो ॥१७॥

येउनिया मंगळवेढ्यास । बहुत दिवस केला वास । मग येउनिया पंढरपुरास । स्वेच्छेने तेथे राहिलो ॥१८॥

तदनंतर बेगमपूर । पाहिले आम्ही सुंदर । रमले आमुचे अंतर । काही दिवस राहिलो ॥१९॥

थोनि स्वेच्छेने केवळ । मग पाहिले मोहोळ । देश हिंडोनी सकळ । सोलापुरी पातलो ॥२०॥

तेथे आम्ही काही महिने । वास केला स्वेच्छेने । अक्कलकोटा-प्रती येणे । तेथोनिया जाहले ॥२१॥

तैपासूनि या नगरात । आनंदे आहो नांदत । ऐसे आमुचे सकल वृत्त । गेले उठोनी उभयता ॥२२॥

ऐकोनिया ऐशी वाणी । उभयता संतोषले मनी । मग स्वामी आज्ञा घेवोनी । गेले उठोनी उभयता ॥२३॥

द्वादश वर्षे मंगळवेढ्याप्रती । राहिले स्वामीराज यती । परी त्या स्थळी प्रख्याती । विशेष त्यांची न जाहली ॥२४॥

सदा वास अरण्यात । बहुधा न येती गावात । जरी आलिया क्वचित । गलिच्छ जागी बैसती ॥२५॥

कोणी काही आमोनि देती । तेचि महाराज भक्षिती । क्षणैक राहूनि मागुती । अरण्यात जाती उठोनी ॥२६॥

वेडा बुवा तयांप्रती । गावातील लोक म्हणती । कोणीही अज्ञाने नेणती । परब्रह्मरुप हे ॥२७॥

त्या समयी नामे दिगंबर । वृत्तीने केवळ जे शंकर । तेव्हा तयांचा अवतार । सोलापुरी जाहला ॥२८॥

ते जाणोनी अंतरखूण । स्वामींसी मानिती ईश्वरासमान । परी दुसरे अज्ञ जन । वेडा म्हणोनी लेखिती ॥२९॥

दर्शना येता दिगंबर । लीलाविग्रही यतिवर्य । कंबरेवरी ठेवूनी कर । दर्शन देती तयासी ॥३०॥

अमृतासमान पुढे कथा । ऐकता पावन श्रोता वक्ता । स्वामी समर्थ वदविता । ज्यांची सत्ता सर्वत्र ॥३१॥

अहो हे स्वामी चरित्र । भरला असे क्षिरसागर । मुक्त करोनी श्रवणद्वार । प्राशन करा श्रोते हो ॥३२॥

तुम्हा नसावा येथे वीट । सर्वदा सेवावे आकंठ । भवभयाचे अरिष्ट । तेणे चुके विष्णू म्हणे ॥३३॥

इति श्री स्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । आनंदे भक्त परिसोत । द्वितीयोऽध्याय गोड हा ॥३४॥

॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥

श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय तिसरा pdf

।। श्री स्वामी चरित्र सारामृत तृतीयोध्याय ।।

॥ श्री गणेशाय नमः॥

॥ धन्य धन्य ते या जगती । स्वामीचरणी ज्यांची भक्ती । त्यांसी नाही पुनरावृत्ती । पद पावती कैवल्य ॥१॥

गताध्यायी कथा सुंदर । स्वामींनी निवेदिले स्वचरित्र । आणि बाबा दिगंबर । त्यांचे वृत्त निवेदिले ॥२॥

निर्विकार स्वामीमूर्ति । लोका चमत्कार दाविती । काही वर्षे करोनी वस्ती । मंगळवेढे सोडिले ॥३॥

मोहोळमाजी वास्तव्य करीता । आप्पा टोळ झाले भक्त । तेथीचे साकल्य वृत्त । अल्पमती केवी वर्णू ॥४॥

स्वामी चरित्राचे हे सार । म्हणून केला नाही विस्तार । वर्णिता कथा समग्र । ग्रंथ पसरे उदधीसम ॥५॥

सवे घेउनी स्वामींसी । टोळ जाती अक्कलकोटासी । अर्धमार्गावरुनी टोळांसी । मागे परतणे भाग पडे ॥६॥

टोळ आज्ञापिले सेवका । जोवरी आम्ही येउ का । तोवरी स्वामींसी सोडू नका । येथेच मुक्काम करावा ॥७॥

टोळ गेलिया परतोनी । स्वामी चालले उठोनी । बहुत वर्जिले सेवकांनी । परी नच मानिले त्या ॥८॥

तेथोनिया निघाले । अक्कलकोटाप्रती आले । ग्रामद्वारी बैसले । यतिराज स्वेच्छेने ॥९॥

तेथे एक अविंध होता । तो करी तयांची थट्टा । परी काही चमत्कार पाहता । महासिद्ध समजला ॥१०॥

पूर्वपुण्यास्तव निश्चिती । आले चोळप्पाचे गृहाप्रती । स्वामींसी जाणोनी ईश्वरमूर्ती । चोळप्पा करी आदर ॥११॥

चोळप्पाचे भाग्य उदेले । यतिराज गृहासी आले । जैसी कामधेनू आपण बळे । दरिद्रियाच्या घरी जाय ॥१२॥

पूर्वपुण्य होते गाठी । म्हणूनी घडल्या या गोष्टी । झाली स्वामीराज भेटी । परम भाग्य तयाचे ॥१३॥

धन्य धन्य तयाचे सदन । जे स्वामींचे वास्तव्यस्थान । सुरवरां जे दुर्लभ चरण । तयाच्या घरी लागले ॥१४॥

योगाभ्यासी योग साधिती । तडी तापडी मार्गी श्रमती । निराहार कितीक राहती । मौन धरिती किती एक ॥१५॥

एक चरणी उभे राहोन । सदा विलोकिती गगन । एक गिरीगव्हरी बैसोन । तपश्चर्या करिताती ॥१६॥

एक पंचाग्निसाधन करिती । एक पवनाते भक्षिती । कित्येक संन्यासी होती । संसार अवघा सांडोनी ॥१७॥

एक करिती किर्तन । एक मांडिती पूजन । एक करिती होमहवन । एक षट्कर्मे आचरिती ॥१८॥

एक लोका उपदेशिती । एक भजनामाजी नाचती । एक ब्राम्हण भोजन करिती । एक बांधिती देवालये ॥१९॥

परी जयाचे चरण । दुर्लभ सद्भक्तिवाचोन । केलियासी नाना साधन । भावाविण सर्व व्यर्थ ॥२०॥

योगयागादिक काही । चोळप्पाने केले नाही । परी भक्तिस्तव पाही । स्वामी आले सदनाते ॥२१॥

तयाची देखोनिया भक्ती । स्वामी तेथे भोजन करिती । तेव्हा चोळप्पाचे चित्ती । आनंद झाला बहुसाळ ॥२२॥

तैपासून तयाचे घरी । राहिले स्वामी अवतारी । दिवसेंदिवस चाकरी । चोळप्पा करी अधिकाधिक ॥२३॥

तेव्ही राज्यपदाधिकारी । मालोजीराजे गादीवरी । दक्ष असोनी कारभारी । परम ज्ञानी असती जे ॥२४॥

अक्कलकोटची प्रख्याती । तेव्हा काही विशेष नव्हती । परी तयांचे भाग्य निश्चिती । स्वामीचरणी उदेले ॥२५॥

तैपासून जगांत । त्या नगराचे नाव गाजत । अप्रसिद्ध ते प्रख्यात । कितीएक जाहले ॥२६॥

चोळप्पाचे गृहाप्रती । आले कोणी एक यती । लोका चमत्कार दाविती । गावात बात पसरली ॥२७॥

आपुली व्हावी प्रख्याती । ऐसे नाही जयांचे चित्ती । म्हणुनिया स्वामीराज यती । बहुधा न जाती फिरावया ॥२८॥

लोकांमाजी पसरली मात । नृपासी कळला वृत्तांत । की आपुलिया नगरात । यती विख्यात पातले ॥२९॥

राहती चोळप्पाचे घरी । दर्शना जाती नरनारी । असती केवळ अवतारी । लीला ज्यांची विचित्र ॥३०॥

वार्ता ऐसी ऐकोनी । राव बोलले काय वाणी । गावात यती येवोनी । फार दिवस जाहले ॥३१॥

परी आम्ही श्रुत पाही । आजवरी जाहले नाही । आता जावोनी लवलाही । भेटू तया यतिवर्या ॥३२॥

परी ते केवळ अंतर्ज्ञानी । ऐसी वार्ता ऐकली कानी । हे सत्य तरी येवोनी । आताच देती दर्शना ॥३३॥

रावमुखातून वाणी निघाली । तोचि यतिमूर्ती पुढे ठेली । सकल सभा चकित झाली । मति गुंगली रायाची ॥३४॥

सिंहासनाखाली उतरोन । राव घाली लोटांगण । प्रेमाश्रूंनी भरले नयन । कंठ झाला सद्गदित ॥३५॥

दृढ घातली मिठी चरणी । चरण धुतले नेत्राश्रूंनी । मग तया हस्तकी धरोनी । आसनावरी बैसविले ॥३६॥

खूण पटली अंतरी । स्वामी केवळ अवतारी । अभक्ती पळोनी गेली दूरी । चरणी भक्ती जडली तै ॥३७॥

सकळ सभा आनंदली । समस्ती पाऊले वंदिली । षोडशोपचारे पूजिली । स्वामीमूर्ती नृपराये ॥३८॥

निराकार आणि निर्गुण । भक्तांसाठी झाले सगुण । तयांच्या पादुका शिरी धरोन । विष्णू नाचे ब्रह्मानंदे ॥३९॥

इति श्रीस्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । प्रेमळ भक्त परिसोत । तृतीयोऽध्याय गोड हा ॥४०॥

॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥

पूरे अध्याय पढ़ने के लिए आपको नीचे दिए गए लिंक का उपयोग कर के स्वामी चरित्र सारामृत १ ते २१ अध्याय PDF में डाउनलोड कर सकते हैं। 

स्वामी चरित्र सारामृत १ ते २१ अध्याय PDF Download Free

SEE PDF PREVIEW ❏

REPORT THISIf the download link of स्वामी चरित्र सारामृत १ ते २१ अध्याय PDF is not working or you feel any other problem with it, please REPORT IT on the download page by selecting the appropriate action such as copyright material / promotion content / link is broken etc. If स्वामी चरित्र सारामृत १ ते २१ अध्याय is a copyright material we will not be providing its PDF or any source for downloading at any cost.

RELATED PDF FILES

Exit mobile version